Thursday, August 4, 2011

पत्रास कारण की...

हल्ली पत्र लिहिणे आणि पाठविणे हा प्रकार फार कमी झाला आहे. पूर्वी पोस्टमनकाका आले कि घरातील सगळे कोणाचे पत्र आले आहे हे बघायला बाहेर येत असे. जवळच्या लोकांच्या सुख दुखाच्या वार्ता पत्रातूनच कळत असे. अनेक शुभवार्ता पत्रातून मिळाल्यामुळे त्याची आठवण म्हणून काहींनी ती पत्रे आजही जपून ठेवलेली असतील. जुनी पत्र वाचतांना ती घटना तो काळ सहज नजरेसमोर यायचा. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींचे एक पत्र सरकार हादरवून सोडायचे. काळ बदलला तसं पत्र लिहिणे, पाठवणे हे कमी होऊ लागले.

सध्या जंतरमंतर पार्ट १ चे हिरो अण्णा हजारे यांनी पत्र लिहायचा संकल्पच सोडलेला आहे. त्यामुळे लोकपाल बिल मंजूर हो न हो पण पत्र लिहिण्याच्या प्रथेला नक्कीच बळ मिळेल कारण अण्णांनी ही पत्रे ४१ वर्षीय तरुण राहुल गांधी यांच्या मातोश्री श्रीमती सोनिया गांधी व अर्थतज्ज्ञ आणि सध्याचे प्रधानमंत्री मनमोहनसिंग यांच्यासकट विरोधीपक्ष नेत्यांना तसेच सर्व खासदारांना पाठविले आहे. असो पण पत्र लिहिण्यात जी मजा आहे ती email send करण्यात नाही. आता आपण सर्वांनीही पत्र लिहिणे सुरु केले पाहिजे. अण्णांनी याबाबतीत पुढाकार घ्यावा म्हणून मी नुकताच त्यांना email ही केला आहे तो अण्णांना केजरीवाल यांच्यामार्फत मिळेलच.

हे लिहीत असतांनाच breaking news आली कि लोकपालचा सरकारी मसुदा नागरी समितीला मान्य नसल्यामुळे अण्णा हजारे यांनी त्या मसुद्याची होळी केली. आजही आपण दोन दोन शिवजयंत्या साजऱ्या करत आहोतच. ऐनवेळी होळी ची घोषणा झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची एक सुट्टी मात्र वाया गेली. आता जंतरमंतर पार्ट २ ही लवकरच येतोय. सध्या श्रावण आणि रमझान सुरु आहे पण श्रावण महिना हा उपवास करण्यासाठी असतो, उपोषण करण्यासाठी नव्हे हे नागरी समितीला मी पत्रातून लवकरच कळवणार आहे.

Wednesday, March 9, 2011

द्रविड कळघम ची द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पर्यंतची वाटचाल...

गेले अनेक दिवस २जी स्पेक्ट्रम मधील भ्रष्टाचारामुळे द्रमुक पक्षाचे नाव देशभर गाजत आहे. संसदेमध्ये या प्रकरणावरुन चांगलाच गदारोळ झाला होता आणि संसद अनेक दिवस ठप्पही झाली होती. या भ्रष्टाचाराचा आरोप असलेला प्रमुख ए. राजा आणि त्यांचा पक्ष द्रमुक म्हणजेच द्रविड मुन्नेत्र कळघम हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. द्रमुकची जडणघडण ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरु झाली आहे. कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या ध्येयासाठी पक्ष स्थापन केला आणि त्याची ध्येयपूर्ती किती झाली हे बघणे आवश्यक आहे. थोडक्यात द्रमुक चा इतिहास आणि आजवरची वाटचाल याचा मागोवा घेतला आहे. सत्तर-ऐंशी च्या दशकात आलेला अण्णा द्रमुकचाही समावेश यात केला आहे.

प्रांतिक कॉंग्रेस अधिवेशन इ.स. १९२० साली तिरुनेलवेली, तामिळनाडु येथे भरले होते. त्या अधिवेशनामधे इ.व्ही. रामस्वामी नायकर यांनी एक ठराव मांडला. ब्राम्हणेतर वर्गाला न्याय मिळावा, कायदेमंडळामधे आणि सरकारी नोकरी मधे जातीनुसार प्रतिनिधीत्व मिळावे इत्यादी तरतुदी या ठरावामध्ये होत्या. त्याला कॉंग्रेस मधील उच्चवर्णीयांनी विरोध दर्शविला.त्यामध्ये सी. राजगोपालचारी, टी. एस. राजन आणि के. संन्थानम यांचा समावेश होता. त्यावेळचे अधिवेशन अध्यक्ष एस. श्रीनिवासन यांनी “ राष्ट्रीय ऐक्य धोक्यात येईल ” हे कारण देऊन हा ठराव फेटाळला. तरीही खचून न जाता इ.व्ही. रामस्वामी नायकर यांनी सलग चार वर्षे प्रयत्न चालु ठेवले. इ.स. १९२५ साली कांचीपुरम येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये या मुद्दयावरुन बराच वादविवाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. “उच्चवर्णीयांची मक्तेदारी असलेला कॉंग्रेस पक्ष नष्ट करणे हे माझे कर्तव्य आहे” अशी घोषणा करुन त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. इग्लंड येथील रॅशनलिस्ट पार्टी च्या धर्तीवर त्यांनी स्वाभिमानी चळवळ सुरु केली.अस्पृश्यता, जाती नष्ट करणॆ या समान मुद्दयांवर त्यांनी जस्टीस पार्टी ला सत्तेत सामील न होता बाहेरुन समर्थन दिले. त्यांच्या पाठिब्यांवर जस्टीस पार्टी सत्तेच्या जवळ पोहोचली आणि जवळजवळ दहा वर्षे सत्ता उपभोगली. दहा वर्षाच्या सत्तेमुळे वरिष्ठ नेते सत्तालोलूप झाले. जस्टीस पार्टीमधे श्रीमंत लोकांचे प्रस्थ वाढले आणि जनतेशी संपर्क तुटला. यामुळे १९३४ आणि १९३७ सालच्या निवडणुकांमधे कॉंग्रेस ने जस्टीस पार्टी चा धुव्वा उडविला. १९३८ मध्ये इ.व्ही. रामस्वामी नायकर यांची जस्टीस पार्टीच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यावेळी इ.व्ही. रामस्वामी नायकर हे तुरुंगात होते. १९४४ साली भरलेल्या अधिवेशनामधे जस्टीस पार्टी आणि स्वाभिमानी चळवळ यांचे विलीनीकरण केले आणि यातुनच द्रविड कळघम चा जन्म झाला. जस्टीस पार्टीतील श्रीमंत वर्ग वेगळा होऊन फुटला पण त्यांचे अस्तित्व नाममात्रच राहिले.

तामीळनाडुमधील कॉंग्रेस विरोधी कार्यकर्त्यांचा मेळावा इ.स. १९४५ तिरुचिरापल्ली येथे भरला होता. त्यामधे स्वतंत्र सार्वभौम द्रविडीयन प्रजासत्ताक तसेच निवडणुकांपासुन दूर राहून लोकजागृतीव असहकार या माध्यमातुन आपले उद्दिष्ट साध्य करणे असा प्रस्ताव सी.एन.अण्णादुराई यांनी मांडला. इ.व्ही.रामस्वामी नायकर यांनी पक्षरचनेत आणि भूमिकेत बदल करण्यास नकार देऊन प्रस्ताव फेटाळला. इ.व्ही.रामस्वामी नायकर यांनी १९४९ मध्ये विवाह करण्याचे ठरविले तेही एका लहान वयाच्या मुलीशी,त्या वेळी त्यांचे वय ७२ होते. आपल्यानंतर त्या मुलीला अध्यक्ष करण्याचा त्यांचा इरादा होता असे म्हणतात. त्यामुळे या गोष्टीला विरोध झाला. दोन सभासद वगळता सर्वांनी अण्णा दुराई यांना पाठिंबा दिला.
इ.व्ही.रामस्वामी नायकर हे द्रविड कळघम चे मुख्य नेते होते. स्वतंत्र तामीळनाड, हिंदी विरुद्धी, मूर्ती विध्वंस इत्यादी कारणांमुळे ते कायम चर्चेत असत. सी.एन.अण्णादुराई बहुमत असूनही इ.व्ही.रामस्वामी नायकर यांचा विरोध टाळला आणि १९४९ मध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम ची स्थापना केली. एका वर्षातच पक्षाची संहिता तयार झाली. मद्रास मधे १९५१ साली सी. एन. अण्णादुराई पक्षाच्या सर्वोच्च्पदी विराजमान झाले. १९५७ सालच्या निवडणुकांमधे द्रविड मुन्नेत्र कळघम ने विधानसभेत १४ तर लोकसभेत २ जागा जिंकल्या तसेच १९५९ मधे मद्रास महापालिकेमधे बहुमत मिळवुन कॉंग्रेस ची मक्तेदारी मोडली. सार्वभौम व स्वायत्त दाक्षिणात्य राज्य या मागणीवर किती भर दयायचा या मुद्दयावरुन सी.एन. अण्णादुराई आणि इ.व्ही.के.संपथ यांच्यामधे मतभेद झाले. १९६१ मधे इ.व्ही.के.संपथ यांनी पक्षत्याग करुन तामीळ नेशनालिस्ट पक्षाची स्थापना केली जो १९६४ मधे काग्रेस मधे विलीनही झाला. द्रविड मुन्नेत्र कळघम ने स्वतंत्र पक्ष आणि फारवर्ड ब्लोक या पक्षांशी समझोता केला होता. द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या जाहीरनाम्यामधे कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडु यांचे मिळुन अखंड द्राविडनाड राज्य ही संकल्पना होती. सार्वभौम व स्वायत्त दाक्षिणात्य राज्य या मागणीवर द्रविड मुन्नेत्र कळघम चा जोर वाढल्यावर कॉंग्रेस ने घटनेत १६ व्या दुरुस्तीमधे भारतातुन फुटुन जाणे हा फौजदारी गुन्हा ठरविला. तेव्हा द्रविड मुन्नेत्र कळघम ने घटनेच्या चौकटीत राहून कार्य करण्याचे मान्य केले. काही प्रमाणात १९६२ चे यद्ध ही या भूमिकाबदलास कारणीभूत ठरले. १९६७ साली द्रविड मुन्नेत्र कळघम ला बहुमत मिळाले. त्यांचे पहिले मंत्रीमंडळ स्थापन झाले आणि सी.एन.अण्णादुराई हे मुख्यमंत्री झाले. दुर्दैवाने त्यांचे १९६९ साली निधन झाले. त्यांच्यानतर पक्षामधे एम.करुणानिधी आणि वी.आर.नेदुंचेजियान यांच्यामधे सत्तासंघर्ष पेटला.१९६९ च्या मुदतपुर्व निवडणुकीमधेही द्रविड मुन्नेत्र कळघम ला बहुमत प्राप्त झाले. या निवडणुका झाल्यावर एम. करुणानिधी आणि तमीळ सुपरस्टार एम.जी रामचंद्रन यांच्यात मतभेद झाले. एम.करुणानिधी हे हुकुमशहा असल्याचा आरोप एम.जी रामचंद्रन यांनी केला त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले. एम.जी.रामचंद्रन यांनी अखेर १९७२ मध्ये अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची स्थापना केली. पक्षाची संहिता ही सी.एन.अण्णादुराई यांच्या तत्वानुसार करण्यात आली. एम.जी रामचंद्रन यांनी एम. करुणानिधी यांच्या विरोधात मोठे आंदोलन केले त्याचा एम.जी रामचंद्रन यांच्या लोकप्रियतेचा परिणाम म्हणून १९७७ साली विधानसभा निवडणुकांमध्ये अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ची सत्ता आली आणि एम.जी.रामचंद्रन हे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले ते १९८७ पर्यंत. डिसेंबर १९८७ मध्ये एम.जी रामचंद्रन यांचे निधन झाले. त्यानंतर जानकी रामचंद्रन या एम.जी.रामचंद्रन यांच्या पत्नी एक वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिल्या. नंतर झालेल्या निवडणुकीमधे द्रमुक पर्यायाने एम.करुणानिधी हे सत्तेत आले.त्याचवेळी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम मधून जयललिता यांचे नेतृत्व पुढे आले. १९९१ साली जयललिता यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ने पुन्हा सत्ता मिळविली.१९९१ नंतर द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ने आळीपाळीने सत्ता उपभोगली म्हणजेच १९९६ मध्ये द्रमुक २००१ मध्ये अण्णा द्रमुक तर २००६ मध्ये परत द्रमुक सत्तेत आले. सी.एन.अण्णादुराई नंतर तामीळ राजकारणामध्ये एम.जी रामचंद्रन, एम.करुणानिधी, जयललिता हे आघाडीवर राहिलेत.

कॉंग्रेस शी फारकत घेऊन द्रविड कळघम चा जन्म झाला खरा पण त्यानंतर अनेकवेळा केंद्रात आणि राज्यात सत्ता उपभोगण्यासाठी एकत्र आले.द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांवर आर्थिक घोटाळयाचे अनेक आरोप झाले आहेत. कॉंग्रेस शी वैर पत्करुन राजकारणाची सुरुवात करणाऱ्या द्रविड कळघम ने वेळोवेळी कॉंग्रेस बरोबर समझोते केले आहे तसेच सत्ता उपभोगण्यासाठी कॉंग्रेसने पण त्याला साथ दिली आहे. LTTE शी संबध असणे आणि स्व. राजीव गांधी यांच्या हत्येत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी असलेला प्रभाकरनबद्दल करुणानिधी यांनी “प्रभाकरन हा माझा मित्र आहे”. असे उद्गार काढले असूनही सत्ता या एकमेव उद्दिष्टापोटी द्रमुक आणि कॉंग्रेस ही युती होऊ शकते तसेच राजकारणात कोणीही अस्पृश्य नसतो हेही यावरुन अधोरेखीत होते.

Monday, February 21, 2011

मातीचा इमला हा ...


मातीचा इमला हा
कणकण हळू ढासळतो
अविरत काळ नावाचा
भवताली फेसळतो
लाहा उठती, फुटती
भिंती पडती, बुडती
अन्ती अवशेष उरे
हीच असे का नियती !

-कुसुमाग्रज

अशीच काहीशी भावना माझीही झाली जेव्हा मी आमचा मारवड ता. अमंळनेर, जिल्हा जळगाव येथील जुना वाडा बघितला.
शेणाने सारवलेले, लाकडी बांधकाम असलेले, वर भला मोठा धाबा ( आत्ताच्या भाषेत टेरेस), प्रकाश येण्या जाण्यासाठी असलेली सानं (जरोके), अख्खे गाव दिसेल आणि २-३ लोकं बसू शकतील एवढा मोठा सज्जा (खिडकी), पंधरा-वीस माणसे एकवेळ जेवतील एवढे मोठे रांधान घर (किचन) आणि दाराच्या वर बाहेर आलेली पडशी, असा हा वाडा, वर्णन करु तेवढे कमी. आता निम्मेअधिक घर पडले आहे, निम्मे पडण्याच्या स्थितीत आहे.

माझा जन्म जरी या घरातला नसला तरी आठवणी आहेत. माझी आधीची पिढी तर या वाडयातच जन्मली आणि वाढली. तीन पिढयांचा संसार या वाडयाने बघितला. आज त्याची अशी दुर्दशा पाहिली कि वाईट वाटते. काळाच्या ओघात गावातली अनेक घरे पडली, पण आमचा वाडा अजून तग धरुन आहे. कदाचित वाट बघत आहे.
आम्ही त्याला जुने वैभव जरी नाही देऊ शकलो तरी निदान त्याची ओळख तर कायम ठेवण्याचा प्रयत्न करु.

Tuesday, February 15, 2011

पुण्यातील पेठा का पेठांमधील पुणे ?

सात वारांनुसार पेठांना नाव देण्याची पध्दत सातारा या शहरात होती. छत्रपतींनीच तेव्हा अशा प्रकारे पेठांची विभागणी केली होती. पेशव्यांनीदेखील याच प्रकारे पुण्यामधे अंमलबजावणी केली आणि आज पुणेकरांना अभिमान असणाऱ्या आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय असणाऱ्या पेठांचा जन्म झाला. त्यातल्या काही वेगवेगळया नावांनी आधी अस्तित्वात होत्या. प्रथम थोडया प्रमाणावर असलेल्या या पेठा कालांतराने वाढू लागल्या, कधी व्यापारी बाजारपेठे साठी कधी राहण्याची जागा अपुरी पडायला लागल्यामुळे. पुण्यातील या पेठांचा दबदबा फार पूर्वीपासून सुरु आहे. आता काळानुरुप काही बदल झाले आहे पण पेठांचा पुणेरीपणा बऱ्याच प्रमाणावर टिकून आहे. यातील काही पेठांच्या इतिहासाचा थोडक्यात मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सोमवार पेठ
इ.स. १७३५ मधे थोरल्या बाजीराव पेशव्यांनी शहापुरा पेठेची नव्याने बांधणी करुन सोमवार पेठ हे नाव दिले. पुर्वेकडुन होणाऱ्या दळणवळणावर लक्ष देण्यासाठी गस्ती नाके बांधले. पुण्याची पूर्व सीमा असल्यामुळे सोमवार पेठेमधे विशेष सुरक्षा ठेवली जायची. येथील नागेश्वर देवालय आबा शेलूकर यांनी बांधले आहे.
मंगळवार पेठ
औरंगजेब बादशाहाचा मामा शाहिस्तेखान दख्खन मोहीमेवर ९ मे १६६० रोजी पुण्यामधे आला. लाल महालात त्यांनी आपला मुक्काम ठोकला आणि अडीच लाखांवर असलेल्या जंगी सैन्याची व्यवस्था आसपासच्या परिसरात करण्यात आली. या भागातुन मुळा नदी जात असल्याने पाण्याची सोय झाली आणि कालांतराने बाजारपेठ. तीन वर्षातच बाजारपेठ बहरली. महाराजांनी शाहिस्तेखानाच्या छावणीवर हल्ला करुन त्याची बोटे छाटली त्यामुळे घाबरुन खान दिल्लीला पळून गेला. शाहिस्तेखानाची पेठ म्हणुन शास्तापुरा असेही म्हणायचे अशी नोंद आढळते.
बुधवार पेठ
रविवार पेठ चार वर्षाच्या आत भरली. त्याच्याजवळ जुन्या मुहियाबाद पेठेमधे जागा होती म्हणून नानासाहेब पेशवे यांनी नवी वसाहत वसविण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे बुधवार पेठ असे नामकरण केले. या ठिकाणी दोन्ही बाजुला कापडाचे व्यापारी व्यवसाय करत असल्यामुळे ‘कापड आळी किंवा कापड गंज’ असेही म्हणतात. जवळच एक मारुती मंदिर होते त्याच्यासमोर नारायणगावी पासोबा विकणारे व्यापारी बसत म्हणून त्याला ‘पासोडया मारुती’ म्हणतात असे सांगितले जाते.
गुरुवार पेठ
बुधवार आणि रविवार पेठांमधली गर्दी वाढली, मोठ्या व्यापाऱ्यांनी तर बरीचशी जागा व्यापून टाकली पण त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांची गैरसोय झाली. आसपासच्या गावातुन माल आणुन विकणारे खुप होते. दिवसभर व्यापार, दिवेलागणीला घरी अशा व्यापाराला मेण बाजार म्हणतात. या व्यापऱ्यांना व्यवस्थित जागा मिळावी यासाठी नानासाहेब पेशव्यांनी ही पेठ वसविली. येथे वेताळाचे देऊळ बांधले त्यामुळे वेताळ पेठ असा उल्लेखही आढळतो. गुरुवार पेठेमधे अठरापगड व्यापारी होते. उदा. सोनार, लोहार, जंगम, मोची, तांबोळी, काची, पेंढारी, छप्परबंद इत्यादी
शुक्रवार पेठ
जीवाची पंत अण्णा खासगीवाले कोतवाल यांनी ही पेठ तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव यांच्या सांगण्यावरुन वसविली होती. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येनुसार ही पेठ इतर पेठांपेक्षा मोठी होती.
शनिवार पेठ
शनिवार पेठ आधीपासून अस्तित्वात असली तरी इ.स. १७९६ ते १८१७ मध्ये शनिवार पेठेचे महत्व वाढले होते. शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांच्याकाळात शनिवार पेठेला अनन्यसाधारण महत्व होते. पेशव्यांचे नातेवाईक, जवळचे, अधिकारी, सरदार, प्रमुख व्यक्ती हे लोक प्रामुख्याने इथे राहायचे.
रविवार पेठ
थोरले बाजीराव पेशवे यांनी रविवार पेठ स्थापन केली. कसबा पेठ आणि शनिवार पेठ येथील वस्ती वाढत होती आणि जागा अपुरी पडत असल्यामुळे थोरले बाजीराव पेशवे यांनी पुर्वीच्या केदार वेशीच्या बाहेर जुन्या मलकापूर पेठेच्या दुतर्फा नव्या पेठेची उभारणी केली आणि ‘रविवार’ (आदितवार) असे नाव दिले. केदार वेस ते पासोडया मारुती मंदिरापर्यंत या रस्त्यावर व्यापाऱ्यांनी बाजारपेठा वसविल्या. शेजारील मुहियाबाद पेठेमधल्या (बुधवार पेठ) कापडआळी मधे दुकानांची भाऊगर्दी झाली होती म्हणून रविवार पेठ दक्षिणेच्या बाजूला वाढवून सराफी दुकाने थाटले गेले. याच्या दक्षिण टोकाला सोन्या मारुती आहे तर रविवार पेठ म्हणजे श्रीमंत व्यापारी पेठ अशी ओळख सांगितली जाते.
कसबा पेठ
कसबा पेठ ही सगळयात जुनी आहे. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती याच ठिकाणी आहे. शहाजी महाराजांनी कसबा पेठ, पुण्याच्या दक्षिणेस येथे भव्य लाल महाल बांधला.
गणेश पेठ
रविवारपेठेच्या पूर्वेला आणि गंजपेठे च्या उत्तरेला वसाहत स्थापण्यात आली आणि गणेश पेठ असे नामकरण करण्यात आले. येथे असणाऱ्या डुल्या मारुतीची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती अशी, पानिपत संहाराच्या बातम्या ऐकून इथला मारुती डोलू लागला म्हणुन याला ‘डुल्या मारुती’ म्हणतात.
मीठगंज / गंजपेठ
या जागी मीठाचा व्यापार, साठवण, विक्री चालायची म्ह्णुन मीठगंज असे नाव पडले. तसेच येथे मोठया प्रमाणावर अन्न मालाची गोदामे होती म्हणुन थोडया दिवसांनी गंजपेठ असे नामकरण करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले स्मारक याच जागेवर असल्यामुळे हल्ली ‘महात्मा फुले’ पेठ असेही म्हणतात.
नारायण पेठ
पानिपत युद्धानंतर ही पेठ वसवण्यात आली पाचवे पेशवे नारायण बाळाजी (मृत्यु १७७३) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही पेठ वसविली.
घोरपडे पेठ
सरदार मालोजीराव घोरपडे (१७८१), यांचे स्वत:चे सैन्यदल होते. त्यांच्या नावानेच ही पेठ वसविली आहे.
नाना पेठ
नानासाहेब पेशवे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि फक्त धान्य व्यापाऱ्यांसाठी नाना पेठ स्थापन केली. व्यापारी उद्देशाकरता ही पेठ वसविली गेली.
रास्ते पेठ
सरदार आनंदराव लक्ष्मण रास्ते (१७८२) हे पेशव्यांचे घोडदल सांभाळायचे त्यांच्याच नावे ही पेठ ओळखली जाते.
भवानी पेठ
नागझरी पलीकडे पुण्याचा विस्तार करण्याचे माधवराव पेशव्यांनी ठरविले त्या जागेवर १६०३ मधे औरंगजेबाच्या सैन्याची छावणी होती. तेथील कारभारी सखाराम भगवंत यांनी मोकळ्या जागी भवानी मंदिर बांधले व पुढे ही भवानी पेठ म्हणुन ओळखली जाऊ लागली. घाऊक व्यापारी, तेलबिया, लाकुड आणि भुसारी किराणा व्यापारी अशी या पेठेची ओळख आजही कायम आहे. जागा भरपूर असल्यामुळे बाहेरुन आलेल्या मालाची चढ-उतार, साठवण आणि वाटप या ठिकाणी होते. या पेठेच्या मध्यभागी चावडी होती त्यावर रामोशी पहारेकरी असायचे. आता जवळच सुर्यमुखी सिध्दीविनायक मंदिराच्या शेजारी रामोशीगेट पोलीस चौकी आहे.

लोकवस्ती वाढली, उदयोगधंदे वाढले नवीन पेठा स्थापन झाल्या. सात वार, सात पेठा हे समीकरण कधीच मागे पडले. आजकाल नवीन शहरेच वसविली जातात. पण या पेठांमुळे बरेचसे पुणेरीपण टिकविले आहे. काळानुरुप बदल झाले असतील पण ते पुणे आता राहिलेच नाही म्हणणाऱ्यांनी इथे चक्कर मारलीच पाहिजे. पुण्याच्या या पेठांचे १८६९ ते १८७२ या दरम्यान रे लाईट या ब्रिटीश अधिकाऱ्याकडून नकाशामापन या शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार सर्वेक्षण करण्यात आले. कारण तेव्हा पेठा म्हणजेच पुणे आणि पुणे म्हणजेच पेठा होते.

संदर्भ :
Puna in the 18 th Century, B.G. Gokhale(1988)
Pune Gazetteer
शहर पुणे , अरुण टिकेकर/अभय टिळक

Sunday, February 6, 2011

Social Justice

All cultures and traditions have grappled with question of justice although they may have interpreted the concept in different ways. For instance, in ancient Indian society, justice was associated with dharma and maintaining dharma or a just social order was considered to be primary duty of kings. In China, Confucius, the famous philosopher argued that kings should maintain justice by punishing wrong doers and rewarding the virtuous. In fourth century B.C. Athens (Greece), Plato discussed issue of justice in his book ‘The republic’. Through a long dialogue between Socrates and his young friends, the young people asked why we should be just. They observed that people who were unjust seemed to be much better than those who were just. Those who twisted rules to serve their interest , avoided paying taxes and were willing to lie and be deceitful, were often more successful than those who were truthful and just. If one were smart enough to avoid being unjust is better than being just. You may have heard people expressing similar sentiments even today.
If everyone were to be unjust, if everybody manipulated rules to suit their own interests, no one could be sure of benefiting from injustice. Nobody would be secure and this is likely to harm all of them.

Equality
Although there might be broad agreement in modern society about the equal importance of all people, it is not simple matter to decide how to give each person his/her due. A number of different principles have been put forward in this regard. One of the principles of treating equals equally. It is considered that all individual share certain characteristics as human beings. Therefore they deserve equal rights and equal treatment. Dr B.R. Ambedkar on social justice, “A just society is that society in which ascending sense of reverence and descending sense of contempt is dissolved into the certain of a compassionate society”
The idea that justice involves giving each person his due continues to be an important part of our present day understanding of justice.

Monday, December 6, 2010

महापरिनिर्वाण दिन...

एका वर्षापूर्वी बरोब्बर याच दिवशी म्हणजे ६ डिसेंबर २००९ रोजी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर जाण्याचा योग आला. मुंबई विद्दयापीठातील पत्रकारिता विभागाने शिवाजी पार्क,दादर येथे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी केंद्र उभारले होते. देशातून लाखोंच्यावर लोक तिथे येतात हे ऎकुन माहित होते पण कधी प्रत्यक्ष डोळयांनी पाहिले नव्हते. मी आणि प्रमोद ५ डिसेंबर पासूनच शिवाजी पार्क वर होतो. मध्यरात्रीपासूनच तिथे गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांना मानणारे त्यांचे अनुयायी कुटुंबासहित येत होते. एवढया मोठयाप्रमाणावर जनसागर येत असूनही सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांच्या मदतीने सगळे सुरळीत आणि शिस्तीत चालले होते हे विशेष. एवढया मोठया प्रमाणवर जनसागर लोटला होता तो केवळ एका माणसासाठी. त्यांना कोणी जबरदस्तीही केली नव्हती कि त्या ठिकाणी कुठल्या पक्षाची सभाही नव्हती जिथे पैसे देऊन माणसे आणली जातात. भीमरायाचा गजर करत हा जनसागर लोटला होता .आजच्या काळात एका माणसासाठी इतक्या मोठया प्रमाणावर त्यांना अभिवादन करण्यासाठी जनसमुदाय जमतो हीच अभूतपूर्व गोष्ट आहे. कुठेही दिसणार नाही अथवा मिळणार नाही अशी वैचारीक आणि अभ्यासू पुस्तकेही तिथे पाहायला मिळाली. आर्थिक, सामाजिक दृष्ट्या पिचलेला असतानाही हा समाज पदरमोड करुन एक तरी पुस्तक विकत घेत होता. निरनिराळया ठिकाणाहून आलेली माणसे लोककलेचे उत्तम सादरीकरण करत होते. प्रत्येकाच्या मुखी भीमरायाचे नाव होते. आपापल्या घरी परतताना येथील प्रत्येक व्यक्ती आपल्या सोबत घेऊन जाणार होती, बाबासाहेबांचे जाज्वल्य विचार आणि स्वाभिमान. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एवढेच म्हणावेसे वाटते कि असा माणूस पुन्हा होणे नाही. न भूतो न भविष्यती....

चाय..ला

आम्ही अट्टल चहाबाज,चोवीस तासात केव्हाही चहा घेऊ शकणारे.कधीही विचारले तरी चहा घ्यायला सदैव तयार बर अर्धाच कप दया,मी आत्ताच घेतला आहे असली वाक्ये आम्ही टाळतोच. का कोण जाणे चहावरच्या या प्रेमाखातर चहाच्या अतिसेवनामुळे होणारी acidity कधी होत नाही.दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो असे म्हणतात पण जर दिवसाची सुरुवात जर चहाने झाली तर दिवस अधिक चांगला जातो.सकाळचा चहा आणि त्याबरोबर वाचायला पेपर याची मजा काही औरच. सर्व सरकारी कचेऱ्या,कार्यालये,विविध खाती यामधे चहापाणी हा समान दुआ आहे.तिथे चहापाणी घेतल्याशिवाय काम होत नाही म्हणजे कामाला हात लावत नाही इतके त्यांचे चहावर प्रेम असते. चहा हे उत्तेजक पेय आहे पण त्याला काळवेळ याचे बंधन नसते. दुसरे उत्तेजक पेय ठरविक वेळीच पिण्यात मजा असते.पण चहा प्यायला काळाचेच काय कारणांचे ही बंधन लागत नाही. थकल्याभागल्यावर किंवा सकाळीउठल्यावर, मिटींगमधे, लेक्चरनंतर, परिक्षा चालू असतांना, ट्रेकींग करतांना चहा हा हवाच. जवळपास सर्वच वयोगटांच्या लोकांमधे चहा प्रिय आहे.कट्टयावर, टपरीवर चहा पित पित चर्चा आणि वादविवाद करणारे अनेकजण आपण बघतो. वयोमानानुसार चर्चेचे विषय जरी वेगवेगळे असले तरी चहा हा दुआ समान असतो.मी चहा पीत नाही, मी फक्त कॉफी पितो/पिते, शी चहा काय असे म्हणणारे महाभाग भेटतात अशा लोकांपासून आम्ही दोन हात दूरच राहतो. खर तर अशा लोकांना ग्रुपमधे खुप शिव्या खाव्या लागतात ती गोष्ट वेगळी.
आत्ता आपण ज्याप्रकारे चहा उठताबसता पिऊ शकतो तस फार पूर्वी करण अशक्य गोष्ट होती. तेव्हा नुकताच चहा भारतीय बाजारपेठेत दाखल झाला असावा. चहा या पेयाला प्रखर विरोधही झाल्याची नोंद इतिहासात सापडते. पुण्यातील पंचहौद मिशन चे चहा-ग्रामण्य प्रकरण तर इतिहासात चांगलेच गाजले होते.हरि नारायण आपटे यांनी आपल्या निवडक मित्रांना पाठविलेली चिठ्ठी अशी होती- उदईक दुपारी आमचेकडे श्रीस्वामी येणार आहे बरोबर शिष्यस्वामीही असतील तरी आपण अगत्य येण्याचे करावे.यातील श्रीस्वामी म्हणजे चहा आणि शिष्यस्वामी म्हणजे बिस्कीट.चोरीचा मामला आणि चहाला प्याला.(संदर्भ: जन-मन,लेखक अरुण टिकेकर) यावरुन लक्षात येईल कि पूर्वी चहा चारचौघात पिणे किती अवघड होते.हळुहळु चहा पेय जनमानसात स्थान निर्माण करु लागले आणि आतातर आपल्या जीवनाचा एक भाग बनून राहिले आहे. आता एक कटिंग, स्पेशल, एक मसाला चाय,अदरक डालके, अण्णा सिंगल अशे आवाज आपण जागोजागी ऐकतो. असं म्हणतात कि बायांनी कुंकवाला तर पुरुषांनी चहाला नाही म्हणू नये.इतकेच काय तर घरातल्या माणसाची ओळख किंवा त्यांचे संस्कार हे त्यांनी बनविलेल्या चहाच्या चवीनुसार ठरविले जातात. ब-याच दिवसांनी घरी सगळे एकत्र जमले की रात्री बाराला चहा झालाच पाहीजे, नाहीतर भेटल्यासारखे वाटत नाही. चहा हे एक अजब रसायन आहे. नुसते साखर आणि चहा टाकुन उकळवलेले पाणी नव्हे. तो उकळेपर्यंत वाट बघावी लागते.. गरम असताना त्याचा एकदम मोठा घोट घेतला तर जीभ भाजते. तो कलेकलेने आणि फुंकून फुंकूनच प्यावा लागतो. ज्याला हे जमतं तो आयुष्यात सुखी होतो. तुम्ही हे वाचायचे कष्ट घ्या तोवर मी आलोच एक कटिंग मारून.