गेले अनेक दिवस २जी स्पेक्ट्रम मधील भ्रष्टाचारामुळे द्रमुक पक्षाचे नाव देशभर गाजत आहे. संसदेमध्ये या प्रकरणावरुन चांगलाच गदारोळ झाला होता आणि संसद अनेक दिवस ठप्पही झाली होती. या भ्रष्टाचाराचा आरोप असलेला प्रमुख ए. राजा आणि त्यांचा पक्ष द्रमुक म्हणजेच द्रविड मुन्नेत्र कळघम हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. द्रमुकची जडणघडण ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरु झाली आहे. कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या ध्येयासाठी पक्ष स्थापन केला आणि त्याची ध्येयपूर्ती किती झाली हे बघणे आवश्यक आहे. थोडक्यात द्रमुक चा इतिहास आणि आजवरची वाटचाल याचा मागोवा घेतला आहे. सत्तर-ऐंशी च्या दशकात आलेला अण्णा द्रमुकचाही समावेश यात केला आहे.
प्रांतिक कॉंग्रेस अधिवेशन इ.स. १९२० साली तिरुनेलवेली, तामिळनाडु येथे भरले होते. त्या अधिवेशनामधे इ.व्ही. रामस्वामी नायकर यांनी एक ठराव मांडला. ब्राम्हणेतर वर्गाला न्याय मिळावा, कायदेमंडळामधे आणि सरकारी नोकरी मधे जातीनुसार प्रतिनिधीत्व मिळावे इत्यादी तरतुदी या ठरावामध्ये होत्या. त्याला कॉंग्रेस मधील उच्चवर्णीयांनी विरोध दर्शविला.त्यामध्ये सी. राजगोपालचारी, टी. एस. राजन आणि के. संन्थानम यांचा समावेश होता. त्यावेळचे अधिवेशन अध्यक्ष एस. श्रीनिवासन यांनी “ राष्ट्रीय ऐक्य धोक्यात येईल ” हे कारण देऊन हा ठराव फेटाळला. तरीही खचून न जाता इ.व्ही. रामस्वामी नायकर यांनी सलग चार वर्षे प्रयत्न चालु ठेवले. इ.स. १९२५ साली कांचीपुरम येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये या मुद्दयावरुन बराच वादविवाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. “उच्चवर्णीयांची मक्तेदारी असलेला कॉंग्रेस पक्ष नष्ट करणे हे माझे कर्तव्य आहे” अशी घोषणा करुन त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. इग्लंड येथील रॅशनलिस्ट पार्टी च्या धर्तीवर त्यांनी स्वाभिमानी चळवळ सुरु केली.अस्पृश्यता, जाती नष्ट करणॆ या समान मुद्दयांवर त्यांनी जस्टीस पार्टी ला सत्तेत सामील न होता बाहेरुन समर्थन दिले. त्यांच्या पाठिब्यांवर जस्टीस पार्टी सत्तेच्या जवळ पोहोचली आणि जवळजवळ दहा वर्षे सत्ता उपभोगली. दहा वर्षाच्या सत्तेमुळे वरिष्ठ नेते सत्तालोलूप झाले. जस्टीस पार्टीमधे श्रीमंत लोकांचे प्रस्थ वाढले आणि जनतेशी संपर्क तुटला. यामुळे १९३४ आणि १९३७ सालच्या निवडणुकांमधे कॉंग्रेस ने जस्टीस पार्टी चा धुव्वा उडविला. १९३८ मध्ये इ.व्ही. रामस्वामी नायकर यांची जस्टीस पार्टीच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यावेळी इ.व्ही. रामस्वामी नायकर हे तुरुंगात होते. १९४४ साली भरलेल्या अधिवेशनामधे जस्टीस पार्टी आणि स्वाभिमानी चळवळ यांचे विलीनीकरण केले आणि यातुनच द्रविड कळघम चा जन्म झाला. जस्टीस पार्टीतील श्रीमंत वर्ग वेगळा होऊन फुटला पण त्यांचे अस्तित्व नाममात्रच राहिले.
तामीळनाडुमधील कॉंग्रेस विरोधी कार्यकर्त्यांचा मेळावा इ.स. १९४५ तिरुचिरापल्ली येथे भरला होता. त्यामधे स्वतंत्र सार्वभौम द्रविडीयन प्रजासत्ताक तसेच निवडणुकांपासुन दूर राहून लोकजागृतीव असहकार या माध्यमातुन आपले उद्दिष्ट साध्य करणे असा प्रस्ताव सी.एन.अण्णादुराई यांनी मांडला. इ.व्ही.रामस्वामी नायकर यांनी पक्षरचनेत आणि भूमिकेत बदल करण्यास नकार देऊन प्रस्ताव फेटाळला. इ.व्ही.रामस्वामी नायकर यांनी १९४९ मध्ये विवाह करण्याचे ठरविले तेही एका लहान वयाच्या मुलीशी,त्या वेळी त्यांचे वय ७२ होते. आपल्यानंतर त्या मुलीला अध्यक्ष करण्याचा त्यांचा इरादा होता असे म्हणतात. त्यामुळे या गोष्टीला विरोध झाला. दोन सभासद वगळता सर्वांनी अण्णा दुराई यांना पाठिंबा दिला.
इ.व्ही.रामस्वामी नायकर हे द्रविड कळघम चे मुख्य नेते होते. स्वतंत्र तामीळनाड, हिंदी विरुद्धी, मूर्ती विध्वंस इत्यादी कारणांमुळे ते कायम चर्चेत असत. सी.एन.अण्णादुराई बहुमत असूनही इ.व्ही.रामस्वामी नायकर यांचा विरोध टाळला आणि १९४९ मध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम ची स्थापना केली. एका वर्षातच पक्षाची संहिता तयार झाली. मद्रास मधे १९५१ साली सी. एन. अण्णादुराई पक्षाच्या सर्वोच्च्पदी विराजमान झाले. १९५७ सालच्या निवडणुकांमधे द्रविड मुन्नेत्र कळघम ने विधानसभेत १४ तर लोकसभेत २ जागा जिंकल्या तसेच १९५९ मधे मद्रास महापालिकेमधे बहुमत मिळवुन कॉंग्रेस ची मक्तेदारी मोडली. सार्वभौम व स्वायत्त दाक्षिणात्य राज्य या मागणीवर किती भर दयायचा या मुद्दयावरुन सी.एन. अण्णादुराई आणि इ.व्ही.के.संपथ यांच्यामधे मतभेद झाले. १९६१ मधे इ.व्ही.के.संपथ यांनी पक्षत्याग करुन तामीळ नेशनालिस्ट पक्षाची स्थापना केली जो १९६४ मधे काग्रेस मधे विलीनही झाला. द्रविड मुन्नेत्र कळघम ने स्वतंत्र पक्ष आणि फारवर्ड ब्लोक या पक्षांशी समझोता केला होता. द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या जाहीरनाम्यामधे कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडु यांचे मिळुन अखंड द्राविडनाड राज्य ही संकल्पना होती. सार्वभौम व स्वायत्त दाक्षिणात्य राज्य या मागणीवर द्रविड मुन्नेत्र कळघम चा जोर वाढल्यावर कॉंग्रेस ने घटनेत १६ व्या दुरुस्तीमधे भारतातुन फुटुन जाणे हा फौजदारी गुन्हा ठरविला. तेव्हा द्रविड मुन्नेत्र कळघम ने घटनेच्या चौकटीत राहून कार्य करण्याचे मान्य केले. काही प्रमाणात १९६२ चे यद्ध ही या भूमिकाबदलास कारणीभूत ठरले. १९६७ साली द्रविड मुन्नेत्र कळघम ला बहुमत मिळाले. त्यांचे पहिले मंत्रीमंडळ स्थापन झाले आणि सी.एन.अण्णादुराई हे मुख्यमंत्री झाले. दुर्दैवाने त्यांचे १९६९ साली निधन झाले. त्यांच्यानतर पक्षामधे एम.करुणानिधी आणि वी.आर.नेदुंचेजियान यांच्यामधे सत्तासंघर्ष पेटला.१९६९ च्या मुदतपुर्व निवडणुकीमधेही द्रविड मुन्नेत्र कळघम ला बहुमत प्राप्त झाले. या निवडणुका झाल्यावर एम. करुणानिधी आणि तमीळ सुपरस्टार एम.जी रामचंद्रन यांच्यात मतभेद झाले. एम.करुणानिधी हे हुकुमशहा असल्याचा आरोप एम.जी रामचंद्रन यांनी केला त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले. एम.जी.रामचंद्रन यांनी अखेर १९७२ मध्ये अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची स्थापना केली. पक्षाची संहिता ही सी.एन.अण्णादुराई यांच्या तत्वानुसार करण्यात आली. एम.जी रामचंद्रन यांनी एम. करुणानिधी यांच्या विरोधात मोठे आंदोलन केले त्याचा एम.जी रामचंद्रन यांच्या लोकप्रियतेचा परिणाम म्हणून १९७७ साली विधानसभा निवडणुकांमध्ये अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ची सत्ता आली आणि एम.जी.रामचंद्रन हे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले ते १९८७ पर्यंत. डिसेंबर १९८७ मध्ये एम.जी रामचंद्रन यांचे निधन झाले. त्यानंतर जानकी रामचंद्रन या एम.जी.रामचंद्रन यांच्या पत्नी एक वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिल्या. नंतर झालेल्या निवडणुकीमधे द्रमुक पर्यायाने एम.करुणानिधी हे सत्तेत आले.त्याचवेळी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम मधून जयललिता यांचे नेतृत्व पुढे आले. १९९१ साली जयललिता यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ने पुन्हा सत्ता मिळविली.१९९१ नंतर द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ने आळीपाळीने सत्ता उपभोगली म्हणजेच १९९६ मध्ये द्रमुक २००१ मध्ये अण्णा द्रमुक तर २००६ मध्ये परत द्रमुक सत्तेत आले. सी.एन.अण्णादुराई नंतर तामीळ राजकारणामध्ये एम.जी रामचंद्रन, एम.करुणानिधी, जयललिता हे आघाडीवर राहिलेत.
कॉंग्रेस शी फारकत घेऊन द्रविड कळघम चा जन्म झाला खरा पण त्यानंतर अनेकवेळा केंद्रात आणि राज्यात सत्ता उपभोगण्यासाठी एकत्र आले.द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांवर आर्थिक घोटाळयाचे अनेक आरोप झाले आहेत. कॉंग्रेस शी वैर पत्करुन राजकारणाची सुरुवात करणाऱ्या द्रविड कळघम ने वेळोवेळी कॉंग्रेस बरोबर समझोते केले आहे तसेच सत्ता उपभोगण्यासाठी कॉंग्रेसने पण त्याला साथ दिली आहे. LTTE शी संबध असणे आणि स्व. राजीव गांधी यांच्या हत्येत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी असलेला प्रभाकरनबद्दल करुणानिधी यांनी “प्रभाकरन हा माझा मित्र आहे”. असे उद्गार काढले असूनही सत्ता या एकमेव उद्दिष्टापोटी द्रमुक आणि कॉंग्रेस ही युती होऊ शकते तसेच राजकारणात कोणीही अस्पृश्य नसतो हेही यावरुन अधोरेखीत होते.