Thursday, August 4, 2011

पत्रास कारण की...

हल्ली पत्र लिहिणे आणि पाठविणे हा प्रकार फार कमी झाला आहे. पूर्वी पोस्टमनकाका आले कि घरातील सगळे कोणाचे पत्र आले आहे हे बघायला बाहेर येत असे. जवळच्या लोकांच्या सुख दुखाच्या वार्ता पत्रातूनच कळत असे. अनेक शुभवार्ता पत्रातून मिळाल्यामुळे त्याची आठवण म्हणून काहींनी ती पत्रे आजही जपून ठेवलेली असतील. जुनी पत्र वाचतांना ती घटना तो काळ सहज नजरेसमोर यायचा. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींचे एक पत्र सरकार हादरवून सोडायचे. काळ बदलला तसं पत्र लिहिणे, पाठवणे हे कमी होऊ लागले.

सध्या जंतरमंतर पार्ट १ चे हिरो अण्णा हजारे यांनी पत्र लिहायचा संकल्पच सोडलेला आहे. त्यामुळे लोकपाल बिल मंजूर हो न हो पण पत्र लिहिण्याच्या प्रथेला नक्कीच बळ मिळेल कारण अण्णांनी ही पत्रे ४१ वर्षीय तरुण राहुल गांधी यांच्या मातोश्री श्रीमती सोनिया गांधी व अर्थतज्ज्ञ आणि सध्याचे प्रधानमंत्री मनमोहनसिंग यांच्यासकट विरोधीपक्ष नेत्यांना तसेच सर्व खासदारांना पाठविले आहे. असो पण पत्र लिहिण्यात जी मजा आहे ती email send करण्यात नाही. आता आपण सर्वांनीही पत्र लिहिणे सुरु केले पाहिजे. अण्णांनी याबाबतीत पुढाकार घ्यावा म्हणून मी नुकताच त्यांना email ही केला आहे तो अण्णांना केजरीवाल यांच्यामार्फत मिळेलच.

हे लिहीत असतांनाच breaking news आली कि लोकपालचा सरकारी मसुदा नागरी समितीला मान्य नसल्यामुळे अण्णा हजारे यांनी त्या मसुद्याची होळी केली. आजही आपण दोन दोन शिवजयंत्या साजऱ्या करत आहोतच. ऐनवेळी होळी ची घोषणा झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची एक सुट्टी मात्र वाया गेली. आता जंतरमंतर पार्ट २ ही लवकरच येतोय. सध्या श्रावण आणि रमझान सुरु आहे पण श्रावण महिना हा उपवास करण्यासाठी असतो, उपोषण करण्यासाठी नव्हे हे नागरी समितीला मी पत्रातून लवकरच कळवणार आहे.