Tuesday, February 15, 2011

पुण्यातील पेठा का पेठांमधील पुणे ?

सात वारांनुसार पेठांना नाव देण्याची पध्दत सातारा या शहरात होती. छत्रपतींनीच तेव्हा अशा प्रकारे पेठांची विभागणी केली होती. पेशव्यांनीदेखील याच प्रकारे पुण्यामधे अंमलबजावणी केली आणि आज पुणेकरांना अभिमान असणाऱ्या आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय असणाऱ्या पेठांचा जन्म झाला. त्यातल्या काही वेगवेगळया नावांनी आधी अस्तित्वात होत्या. प्रथम थोडया प्रमाणावर असलेल्या या पेठा कालांतराने वाढू लागल्या, कधी व्यापारी बाजारपेठे साठी कधी राहण्याची जागा अपुरी पडायला लागल्यामुळे. पुण्यातील या पेठांचा दबदबा फार पूर्वीपासून सुरु आहे. आता काळानुरुप काही बदल झाले आहे पण पेठांचा पुणेरीपणा बऱ्याच प्रमाणावर टिकून आहे. यातील काही पेठांच्या इतिहासाचा थोडक्यात मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सोमवार पेठ
इ.स. १७३५ मधे थोरल्या बाजीराव पेशव्यांनी शहापुरा पेठेची नव्याने बांधणी करुन सोमवार पेठ हे नाव दिले. पुर्वेकडुन होणाऱ्या दळणवळणावर लक्ष देण्यासाठी गस्ती नाके बांधले. पुण्याची पूर्व सीमा असल्यामुळे सोमवार पेठेमधे विशेष सुरक्षा ठेवली जायची. येथील नागेश्वर देवालय आबा शेलूकर यांनी बांधले आहे.
मंगळवार पेठ
औरंगजेब बादशाहाचा मामा शाहिस्तेखान दख्खन मोहीमेवर ९ मे १६६० रोजी पुण्यामधे आला. लाल महालात त्यांनी आपला मुक्काम ठोकला आणि अडीच लाखांवर असलेल्या जंगी सैन्याची व्यवस्था आसपासच्या परिसरात करण्यात आली. या भागातुन मुळा नदी जात असल्याने पाण्याची सोय झाली आणि कालांतराने बाजारपेठ. तीन वर्षातच बाजारपेठ बहरली. महाराजांनी शाहिस्तेखानाच्या छावणीवर हल्ला करुन त्याची बोटे छाटली त्यामुळे घाबरुन खान दिल्लीला पळून गेला. शाहिस्तेखानाची पेठ म्हणुन शास्तापुरा असेही म्हणायचे अशी नोंद आढळते.
बुधवार पेठ
रविवार पेठ चार वर्षाच्या आत भरली. त्याच्याजवळ जुन्या मुहियाबाद पेठेमधे जागा होती म्हणून नानासाहेब पेशवे यांनी नवी वसाहत वसविण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे बुधवार पेठ असे नामकरण केले. या ठिकाणी दोन्ही बाजुला कापडाचे व्यापारी व्यवसाय करत असल्यामुळे ‘कापड आळी किंवा कापड गंज’ असेही म्हणतात. जवळच एक मारुती मंदिर होते त्याच्यासमोर नारायणगावी पासोबा विकणारे व्यापारी बसत म्हणून त्याला ‘पासोडया मारुती’ म्हणतात असे सांगितले जाते.
गुरुवार पेठ
बुधवार आणि रविवार पेठांमधली गर्दी वाढली, मोठ्या व्यापाऱ्यांनी तर बरीचशी जागा व्यापून टाकली पण त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांची गैरसोय झाली. आसपासच्या गावातुन माल आणुन विकणारे खुप होते. दिवसभर व्यापार, दिवेलागणीला घरी अशा व्यापाराला मेण बाजार म्हणतात. या व्यापऱ्यांना व्यवस्थित जागा मिळावी यासाठी नानासाहेब पेशव्यांनी ही पेठ वसविली. येथे वेताळाचे देऊळ बांधले त्यामुळे वेताळ पेठ असा उल्लेखही आढळतो. गुरुवार पेठेमधे अठरापगड व्यापारी होते. उदा. सोनार, लोहार, जंगम, मोची, तांबोळी, काची, पेंढारी, छप्परबंद इत्यादी
शुक्रवार पेठ
जीवाची पंत अण्णा खासगीवाले कोतवाल यांनी ही पेठ तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव यांच्या सांगण्यावरुन वसविली होती. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येनुसार ही पेठ इतर पेठांपेक्षा मोठी होती.
शनिवार पेठ
शनिवार पेठ आधीपासून अस्तित्वात असली तरी इ.स. १७९६ ते १८१७ मध्ये शनिवार पेठेचे महत्व वाढले होते. शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांच्याकाळात शनिवार पेठेला अनन्यसाधारण महत्व होते. पेशव्यांचे नातेवाईक, जवळचे, अधिकारी, सरदार, प्रमुख व्यक्ती हे लोक प्रामुख्याने इथे राहायचे.
रविवार पेठ
थोरले बाजीराव पेशवे यांनी रविवार पेठ स्थापन केली. कसबा पेठ आणि शनिवार पेठ येथील वस्ती वाढत होती आणि जागा अपुरी पडत असल्यामुळे थोरले बाजीराव पेशवे यांनी पुर्वीच्या केदार वेशीच्या बाहेर जुन्या मलकापूर पेठेच्या दुतर्फा नव्या पेठेची उभारणी केली आणि ‘रविवार’ (आदितवार) असे नाव दिले. केदार वेस ते पासोडया मारुती मंदिरापर्यंत या रस्त्यावर व्यापाऱ्यांनी बाजारपेठा वसविल्या. शेजारील मुहियाबाद पेठेमधल्या (बुधवार पेठ) कापडआळी मधे दुकानांची भाऊगर्दी झाली होती म्हणून रविवार पेठ दक्षिणेच्या बाजूला वाढवून सराफी दुकाने थाटले गेले. याच्या दक्षिण टोकाला सोन्या मारुती आहे तर रविवार पेठ म्हणजे श्रीमंत व्यापारी पेठ अशी ओळख सांगितली जाते.
कसबा पेठ
कसबा पेठ ही सगळयात जुनी आहे. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती याच ठिकाणी आहे. शहाजी महाराजांनी कसबा पेठ, पुण्याच्या दक्षिणेस येथे भव्य लाल महाल बांधला.
गणेश पेठ
रविवारपेठेच्या पूर्वेला आणि गंजपेठे च्या उत्तरेला वसाहत स्थापण्यात आली आणि गणेश पेठ असे नामकरण करण्यात आले. येथे असणाऱ्या डुल्या मारुतीची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती अशी, पानिपत संहाराच्या बातम्या ऐकून इथला मारुती डोलू लागला म्हणुन याला ‘डुल्या मारुती’ म्हणतात.
मीठगंज / गंजपेठ
या जागी मीठाचा व्यापार, साठवण, विक्री चालायची म्ह्णुन मीठगंज असे नाव पडले. तसेच येथे मोठया प्रमाणावर अन्न मालाची गोदामे होती म्हणुन थोडया दिवसांनी गंजपेठ असे नामकरण करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले स्मारक याच जागेवर असल्यामुळे हल्ली ‘महात्मा फुले’ पेठ असेही म्हणतात.
नारायण पेठ
पानिपत युद्धानंतर ही पेठ वसवण्यात आली पाचवे पेशवे नारायण बाळाजी (मृत्यु १७७३) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही पेठ वसविली.
घोरपडे पेठ
सरदार मालोजीराव घोरपडे (१७८१), यांचे स्वत:चे सैन्यदल होते. त्यांच्या नावानेच ही पेठ वसविली आहे.
नाना पेठ
नानासाहेब पेशवे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि फक्त धान्य व्यापाऱ्यांसाठी नाना पेठ स्थापन केली. व्यापारी उद्देशाकरता ही पेठ वसविली गेली.
रास्ते पेठ
सरदार आनंदराव लक्ष्मण रास्ते (१७८२) हे पेशव्यांचे घोडदल सांभाळायचे त्यांच्याच नावे ही पेठ ओळखली जाते.
भवानी पेठ
नागझरी पलीकडे पुण्याचा विस्तार करण्याचे माधवराव पेशव्यांनी ठरविले त्या जागेवर १६०३ मधे औरंगजेबाच्या सैन्याची छावणी होती. तेथील कारभारी सखाराम भगवंत यांनी मोकळ्या जागी भवानी मंदिर बांधले व पुढे ही भवानी पेठ म्हणुन ओळखली जाऊ लागली. घाऊक व्यापारी, तेलबिया, लाकुड आणि भुसारी किराणा व्यापारी अशी या पेठेची ओळख आजही कायम आहे. जागा भरपूर असल्यामुळे बाहेरुन आलेल्या मालाची चढ-उतार, साठवण आणि वाटप या ठिकाणी होते. या पेठेच्या मध्यभागी चावडी होती त्यावर रामोशी पहारेकरी असायचे. आता जवळच सुर्यमुखी सिध्दीविनायक मंदिराच्या शेजारी रामोशीगेट पोलीस चौकी आहे.

लोकवस्ती वाढली, उदयोगधंदे वाढले नवीन पेठा स्थापन झाल्या. सात वार, सात पेठा हे समीकरण कधीच मागे पडले. आजकाल नवीन शहरेच वसविली जातात. पण या पेठांमुळे बरेचसे पुणेरीपण टिकविले आहे. काळानुरुप बदल झाले असतील पण ते पुणे आता राहिलेच नाही म्हणणाऱ्यांनी इथे चक्कर मारलीच पाहिजे. पुण्याच्या या पेठांचे १८६९ ते १८७२ या दरम्यान रे लाईट या ब्रिटीश अधिकाऱ्याकडून नकाशामापन या शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार सर्वेक्षण करण्यात आले. कारण तेव्हा पेठा म्हणजेच पुणे आणि पुणे म्हणजेच पेठा होते.

संदर्भ :
Puna in the 18 th Century, B.G. Gokhale(1988)
Pune Gazetteer
शहर पुणे , अरुण टिकेकर/अभय टिळक