Monday, February 21, 2011

मातीचा इमला हा ...


मातीचा इमला हा
कणकण हळू ढासळतो
अविरत काळ नावाचा
भवताली फेसळतो
लाहा उठती, फुटती
भिंती पडती, बुडती
अन्ती अवशेष उरे
हीच असे का नियती !

-कुसुमाग्रज

अशीच काहीशी भावना माझीही झाली जेव्हा मी आमचा मारवड ता. अमंळनेर, जिल्हा जळगाव येथील जुना वाडा बघितला.
शेणाने सारवलेले, लाकडी बांधकाम असलेले, वर भला मोठा धाबा ( आत्ताच्या भाषेत टेरेस), प्रकाश येण्या जाण्यासाठी असलेली सानं (जरोके), अख्खे गाव दिसेल आणि २-३ लोकं बसू शकतील एवढा मोठा सज्जा (खिडकी), पंधरा-वीस माणसे एकवेळ जेवतील एवढे मोठे रांधान घर (किचन) आणि दाराच्या वर बाहेर आलेली पडशी, असा हा वाडा, वर्णन करु तेवढे कमी. आता निम्मेअधिक घर पडले आहे, निम्मे पडण्याच्या स्थितीत आहे.

माझा जन्म जरी या घरातला नसला तरी आठवणी आहेत. माझी आधीची पिढी तर या वाडयातच जन्मली आणि वाढली. तीन पिढयांचा संसार या वाडयाने बघितला. आज त्याची अशी दुर्दशा पाहिली कि वाईट वाटते. काळाच्या ओघात गावातली अनेक घरे पडली, पण आमचा वाडा अजून तग धरुन आहे. कदाचित वाट बघत आहे.
आम्ही त्याला जुने वैभव जरी नाही देऊ शकलो तरी निदान त्याची ओळख तर कायम ठेवण्याचा प्रयत्न करु.

1 comment:

  1. आपण शहरी वातावरणात वाढलेल्या तरुणांसाठी खरंच हे वाडे/ गढी एक अनमोल ठेवा आहे, आपल्या पूर्वजांना जाणून घेण्यासाठी. तु खूप छान लिहीलं आहेस. ओळख जपण्याचा तुझा आशावाद स्तुत्य आहे. पुणॆ किंवा तुझ्या नजरेस पडणाऱ्या अशा काही अज्ञात वाड्यांविषयी जर तु लिखाण केलेस तर ते आम्हां वाचकांसाठी एक पर्वणी ठरेल आणि इतिहासात दबलेल्या नायकांना उजेडात येण्याची संधी मिळेल.

    ReplyDelete