Monday, December 6, 2010
महापरिनिर्वाण दिन...
एका वर्षापूर्वी बरोब्बर याच दिवशी म्हणजे ६ डिसेंबर २००९ रोजी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर जाण्याचा योग आला. मुंबई विद्दयापीठातील पत्रकारिता विभागाने शिवाजी पार्क,दादर येथे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी केंद्र उभारले होते. देशातून लाखोंच्यावर लोक तिथे येतात हे ऎकुन माहित होते पण कधी प्रत्यक्ष डोळयांनी पाहिले नव्हते. मी आणि प्रमोद ५ डिसेंबर पासूनच शिवाजी पार्क वर होतो. मध्यरात्रीपासूनच तिथे गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांना मानणारे त्यांचे अनुयायी कुटुंबासहित येत होते. एवढया मोठयाप्रमाणावर जनसागर येत असूनही सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांच्या मदतीने सगळे सुरळीत आणि शिस्तीत चालले होते हे विशेष. एवढया मोठया प्रमाणवर जनसागर लोटला होता तो केवळ एका माणसासाठी. त्यांना कोणी जबरदस्तीही केली नव्हती कि त्या ठिकाणी कुठल्या पक्षाची सभाही नव्हती जिथे पैसे देऊन माणसे आणली जातात. भीमरायाचा गजर करत हा जनसागर लोटला होता .आजच्या काळात एका माणसासाठी इतक्या मोठया प्रमाणावर त्यांना अभिवादन करण्यासाठी जनसमुदाय जमतो हीच अभूतपूर्व गोष्ट आहे. कुठेही दिसणार नाही अथवा मिळणार नाही अशी वैचारीक आणि अभ्यासू पुस्तकेही तिथे पाहायला मिळाली. आर्थिक, सामाजिक दृष्ट्या पिचलेला असतानाही हा समाज पदरमोड करुन एक तरी पुस्तक विकत घेत होता. निरनिराळया ठिकाणाहून आलेली माणसे लोककलेचे उत्तम सादरीकरण करत होते. प्रत्येकाच्या मुखी भीमरायाचे नाव होते. आपापल्या घरी परतताना येथील प्रत्येक व्यक्ती आपल्या सोबत घेऊन जाणार होती, बाबासाहेबांचे जाज्वल्य विचार आणि स्वाभिमान. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एवढेच म्हणावेसे वाटते कि असा माणूस पुन्हा होणे नाही. न भूतो न भविष्यती....
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझ्यासोबत ‘कुलकर्णी’ चैत्यभूमीवर फिरतोय असं जर कुणाला सांगितलं असतं तर त्या गर्दीतला कोणीही उडाला असता. पदोपदी डायरेक्ट वा इनडायरेक्ट आजही जातीयतेचे चटके अनुभवणाऱ्या या समाजामध्ये त्या दिवशीचं तुझं असणं म्हणजे एक सुखद अनुभव होता. तुझ्यासारखे धाडस ‘इतर’ तरुणांनी देखील दाखविले तर बाबासाहेबांना दिलेली ती खरी श्रद्धांजली ठरेल.
ReplyDelete